विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरीची नोंदवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली.

या विजयासह घरच्या मैदानावरचा भारतीय संघाचा हा विक्रमी सलग ११ वा कसोटी मालिका विजय ठरला. याशिवाय कर्णधार म्हणून हा विराटचा १३ वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट हा कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक मालिका विजय मिळवणारा भारतीय ठरला. त्याने महेंद्रसिंग धोनी याला मागे टाकले. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करताना १२ कसोटी मालिकांमध्ये भारताला विजय मिळवून दिला. तो विक्रम विराटने मोडला. या यादीत ९ मालिका विजयांसह सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी आहे.

आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली. विराटने भारताच्या डावाला आकार देताना धमाकेदार नाबाद २५४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने ६०० धावांपार मजल मारली. ६०१ धावांवर भारताने डाव घोषित केला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ३३६ चेंडूत २५४ धावांची खेळी केली. त्या खेळीत त्याने ३३ चौकार आणि २ षटकार लगावले.

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ६०१ धावांवर डाव घोषित केला. आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांवर आटोपला. भारताकडे त्रिशतकी आघाडी असल्याने आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांचा डाव १८९ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने सामना एक डाव व १३७ धावांनी जिंकला.