भारताविरूद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. भारताने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने १७ षटकातच पूर्ण केले. डी कॉक नाबाद ७९ धावा करत विजयाचा शिल्पकार ठरला. त्यामुळे तीन टी-२० सामन्यांची ही मालिका अखेरीस १-१ अशा बरोबरीत सुटली.

तिसऱ्या आणि अखरेच्या सामन्यात भारताला सुमार फलंदाजीचा फटका बसला. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. काही काळ झुंज देणारा  शिखर धवनही ३६ धावा काढून माघारी परतला. ज्यावेळी सामन्यात शिखर धवन बाद झाला, तेव्हा भारताच्या फलंदाजांमध्ये एक गोंधळ पाहायला मिळाला. धवन बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर दोघेही चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानावर यायला उठले. दोघांमध्ये झालेल्या गोंधळामुळे काही काळ कोण जाणार हे ठरत नव्हतं. अखेर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळायला मैदानात गेला.

या प्रकारानंतर काही काळ हा चर्चेचा विषय ठरला. साहजिकच सामन्यानंतर याबाबत कोहलीला प्रश्न विचारण्यात आला. त्या गोंधळावर बोलताना कोहली थोडासा हसला आणि त्याने याचे उत्तर दिले. कोहली म्हणाला की दोघांमध्ये थोडासा गोंधळ झाला. फलंदाजी प्रशिक्षकांनी नीट योजना आखली होती. त्यात सामन्याच्या कोणत्या टप्प्यावर कोणत्या फलंदाजाने खेळायला जायचे हे ठरवले होते. पण दोघांनाही मैदानावर फलंदाजीसाठी यायची इच्छा होती. जर खरंच दोघेही एकत्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आले असते, तर ते खूपच हास्यास्पद दिसले असते.

“माझ्या मते १० षटकांचा खेळ झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात येईल आणि त्या आधी जर दोन गडी बाद झाले तर श्रेयस अय्यर मैदानावर येईल असे ठरले होते. पण मुख्य वेळी दोघांमध्ये गोंधळ झाला आणि नक्की कोणी मैदानात खेळायला उतरावे हे समजले नाही”, असे कोहलीने स्पष्ट केले.