मुंबईकर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात धडाकेबाज खेळी केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करत रोहित शर्माने आपण कसोटी क्रिकेट खेळण्यासाठीही उपयुक्त असल्याचं दाखवून दिलं आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना रोहितने १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने रोहितचं हे दुसरं तर एकूण कारकिर्दीतलं पाचवं शतक ठरलं. मात्र इतकी आश्वासक खेळी करुनही रोहितच्या नावावर एका नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांत यष्टीचीत होणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावात रोहित शर्मा केशव महाराजच्या गोलंदाजीवर १७६ धावांवर यष्टीचीत होऊन माघारी परतला. यानंतर दुसऱ्या डावातही रोहित शर्मा १२७ धावांवर केशव महाराजच्या गोलंदाजीवरच माघारी परतला. रोहितने चेतेश्वर पुजाराच्या सहाय्याने १६९ धावांची भागीदारी रचत भारताला त्रिशतकी आघाडी मिळवून दिली.