ए. सी. रूममध्ये बसून समालोचन करणाऱ्या समालोचकाचा ऐनवेळेस पार्थिव पटेल आणि हार्दिक पंड्या यांच्यात गोंधळ उडून तो हार्दिक पटेल असे नाव घेत असेल तर भारतीय उपखंडातील फलंदाजाकरता सर्वात कठीण परीक्षेच्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टयांवर कोणत्याही विस्तृत तयारीशिवाय उभे केले तर ऐनवेळेस काय होते हे समजणे अवघड नाही.

तयारीचा मुद्दा कळीचा

भारतीय खेळपट्टयांवर दमदार कामगिरी करायची असं ठरवून पंधरा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन दौऱ्याच्या खूप आधी भारतात येऊन टर्निंग ट्रॅक वर सराव करत बसला होता. त्या सूक्ष्म तयारीवर त्याने भारताला जेरीस आणले. स्वीपच्या फटक्याने त्याने भारतीय स्पीनर्सला नामोहरम केले. आफ्रिकेच्या खेळपट्ट्या भारतीय फलंदाजांकरता सगळ्यात अवघड. हे एव्हरेस्ट सर करायचे म्हणजे किती आधीपासून तयारी केली पाहिजे. एकतर भारतीय संघाचे अतिव्यस्त वेळापत्रक. त्यातून संघाची लग्नकार्ये, पाहुणेरावळे, मधुचंद्र सगळं आफ्रिका दौऱ्यालालागून. आफ्रिका दौऱ्याआधी श्रीलंकासारख्या ‘अतिबलाढ्य’ संघाशी दोन हात करून दिग्विजय मिळवण्यात धंदेवाईक धन्यतेपेक्षा काही नाही हे माहित असूनही सोसाने त्या संघाशी डझनभर सामने खेळायचे. त्यातून तो श्रीलंका संघ नेपाळच्या पंतप्रधानांसारखा उठसूट भारत दौऱ्यावर येत असतो. दोघांच्याही दौऱ्याचे फलित काय ते त्या नेपाळच्या पशुपतीनाथालाच ठाऊक.

पहिल्या कसोटीने खच्चीकरण केले

दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजांची बाद होण्याची पद्धत पाहिली की लक्षात येते की पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीचा धसका त्यांनी चांगलाच घेतला होता. दुसऱ्या डावात राहुलची बाद होण्याची पद्धत, पुजाराचे दोन्ही डावात धावबाद होणे, पंड्याचे व्हॉलीबॉल खेळाडूंसारखे चेंडूला स्मॅश मारायला जाणे यावरून दिसून आले की खेळाडू मनातून साशंक होते. मनात सारखी चिंता पुढच्या बॉलला मी टीकेन की बाद झालेलो असेन ही होती.

खेळपट्टीची भूमिका

पहिल्या कसोटीतिल खेळपट्टी सोपी नव्हती. पंड्याने ९३ धावा केल्या.त्याने अनेक धोके पत्करले. पण तो तरला. इतर फलंदाजांनी धोके पत्करले पण ते बाद झाले. डिव्हिल्लीर्स ने धावा केल्या पण किती चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागून लेग स्टंपच्या बाजूने गेले याची गिणती नाही. कोहली ज्या उसळत्या चेंडूवर मॉरकलला बाद झाला तसे अनेक चेंडू पुजारा आणि रोहितला पडले पण बॅटचीकड थोडक्यात हुकली. तात्पर्य हे की ज्या खेळपट्ट्यावर उभे रहायचे वांदे तिथे धावा व्हायला उंच इमारतीवरून बरोबर पायांच्या पंजावर पडणाऱ्या मांजराचे नशीब हवे. अशा खेळपट्टयांवर फलंदाजांच्या अपयशाला तांत्रिक त्रुटींना जबाबदार धरणे संयुक्तिक होणार नाही. अशा खेळपट्ट्यावर १४५ च्या वेगाने येणाऱ्या चेंडूला तोंड देताना संतुलनाकरता पाय आपोआप हालतात आणि आपण त्याला फुटवर्क म्हणतो. इतक्या झपकन अचानक आत येणाऱ्या, अचानक उसळ्या घेणाऱ्या, कधी खाली रहाणाऱ्या चेंडूवर पहिली अंत:प्रेरणा असते ती तग धरण्याची. पाय ऍक्रोस कसा गेला नाही, बॅट चूकीच्या अँगलने खाली कशी आली, डोके चेंडूच्या रेषेत कसे खाली आले नाही या पांडित्याला प्रेक्षकांच्या धगधगत्या रागाला वाट करून देणे आणि जाहिराती पदरात पाडून घेणे या पलीकडे फार महत्व नाही. अशा खेळपट्टयांवर भरपूर सराव मिळणार नसेल तर अपयशाची जबाबदारी बोर्डाने घ्यायला हवी. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आफ्रिकेचा दौरा करणाऱ्यांना जुळवून घ्यायला त्रास होतो तिथे नव्यांची काय कथा?

संघनिवडीवरून काहूर

सिरीज जिंकायची या उद्देशाने काही अटकळी लावून कोहलीने त्याच्या आतल्या आवाजाला स्मरून संघ निवडला. त्याची निवड रुढीबद्ध नव्हती. आत्तापर्यंत चाकोरीबाहेरचे निर्णय घेऊन तो यशस्वी झाला आहे. या वेळेस त्याला यश आले नाही म्हणून त्याला इतका झोडपणे योग्य नाही. पांड्या, पार्थिव आणि अश्विन मिळून दोन फलंदाजांचे काम करू शकतात हा विचार होता. रहाणेचा समावेश न झाल्याने टीका करणारे लोक या खेळपट्यावर रहाणेच्या कामगिरीची खात्री देऊ शकले असते का? एकमात्र खरे की संघ निवडीचे सर्वप्रकारचे अमर्याद स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या कोहलीला अपयशाची जबाबदारी घ्यावी लागेल. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते एवढा समंजसपणा त्याच्यात असलाच पाहिजे.

बॉलर्स ने काम केले पण

भारताच्या बॉलर्स ने २० विकेट घेतल्या पण प्रत्येक डावात ७० ते ८० धावा जास्तं देऊन. आफ्रिकेचे गोलंदाज खेळपट्टीवर एकाच ठिकाणी १४० च्या वेगाने सहा चेंडू टाकण्यात तरबेज आहेत. त्यांचे चेंडू कमीतकमी एक फूट अधिक उंचीवरून येतात. भारताची बॉलिंग होती तर आफ्रिकेचा बॉलिंग ‘ऍटॅक’ होता. अश्विनने सामन्यात पाच विकेट्स घेऊन चांगला हातभार लावला.

अफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न यावेळेस सुद्धा पूर्ण होणार नाही. ते पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर भविष्यात गांभिर्याने नियोजन करावे लागेल. त्याकरता बोर्डात आणि संघात तितकी झपाटलेली माणसं हवीत.
रवि पत्की – sachoten@hotmail.com