दक्षिण आफ्रिकेचा संघ १५ सप्टेंबरपासून भारताविरूद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. ३ टी २० आणि ३ कसोटी सामन्यांच्या मालिका दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यादरम्यान होणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला असून त्यांनी सरावाला सुरूवात केली आहे. भारताच्या संघातील दमदार फलंदाजीपुढे आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे तगडे आव्हान असणार आहे. या दरम्यान दौरा सुरू होण्याआधी रबाडाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? याचे उत्तर दिले आहे.

रबाडाकडे IPL चा चांगला अनुभव आहे. त्याने IPL 2019 मध्ये दिल्ली संघाकडून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना रबाडाची गोलंदाजी काळजीपूर्वक हाताळावी लागणार आहे. पण या दरम्यान रबाडाने विराटला निर्धारित षटकांच्या सामन्यातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे.  “विराट कोहली हा निर्धारित षटकांच्या सामन्यातील सर्वोत्तम फलंदाज आहे. कोहलीने हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. क्रिकेट खेळात त्याच्याकडे एक प्रेरणास्रोत म्हणून पाहिले जाते”, असे त्याने म्हटले आहे.

“विराटच्या खेळीत लढाऊवृत्ती कायम दिसून येते. पण आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कोण कसं फलंदाजी करतं त्याकडे लक्ष न देता आम्ही निर्भिडपणे गोलंदाजी करणार आहोत. सध्या आम्ही त्याप्रमाणे आमच्या योजना आखल्या आहेत. खेळाचा आनंद घेत आम्ही झुंज देणार आहोत. त्यामुळे आम्ही खूप सकारात्मक आहोत”, असेही रबाडाने सांगितले.

दक्षिण आफ्रिका टी २० संघ – क्विंटन डी-कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), वॅन डर डसन (उप-कर्णधार), टेम्बा बावुमा, ज्युनिअर डाला, बिजॉर्न फॉर्च्युन, ब्येरन हँड्रीक्स, रेझा हँड्रीक्स, डेव्हिड मिलर, अ‍ॅन्रिच नॉर्ट्जे, अँडील फेलुक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, जॉन जॉन स्मट्स

भारताचा टी २० संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी