कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले. भारताने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. डी-कॉकने नाबाद ७९ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५२ चेंडूत नाबाद ७९ धावा ठोकल्या. भारतीय गोलंदाजांना त्याने अक्षरश: चोपून काढले.

डी कॉकच्या खेळीच्या जोरावर तीन टी २० सामन्यांची मालिका अखेरीस १-१ अशी बरोबरीत सुटली. या खेळीबीबत डी कॉकने सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही खेळताना फार दडपण घेतले नाही. आम्ही सहजपणे खेळत राहिलो. चांगल्या आणि तुलनेने सोप्या चेंडूवर मोठे फटके खेळलो. म्हणून आम्हाला धावांचा पाठलाग करणे सोपे गेले”, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉक म्हणाला.

“आमच्या फिरकीपटूंनी भारताच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. ब्युरन हा खूपच प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. सामना ज्या खेळपट्टीवर खेळण्यात आला, त्या खेळपट्टीवर काही वेळा संथ गतीने गोलंदाजी करणे फायद्याचे ठरले. सामन्यात आमची गोलंदाजी उत्तम दर्जाची झाली. तसेत गेल्या सामन्यातील चुकांमधूनही आम्ही काही गोष्टी शिकलो. त्यात सुधारणा केली. त्यामुळे आम्हाला विजय मिळवता आला”, असे त्याने नमूद केले.