धमाकेदार फलंदाजी आणि अप्रतिम भारतीय फिरकी गोलंदाजी यामुळे दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. पहिला डाव ७ बाद ५०२ वर भारताने घोषित केल्यानंतर भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अश्विनने दोन तर जाडेजाने एक गडी तंबूत पाठवला. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर मयांक अग्रवालचं चहुबाजूने कौतुक करण्यात आले. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री संयमी खेर ही देखील त्याच्या खेळीवर फिदा झाल्याचे दिसून आले.

भारतीय सलामीवीरांनी दमदार खेळी केली. रोहित शर्मा दीडशतक (१७६) ठोकून बाद झाला. पण सलामीवीर मयांक अग्रवालने मात्र द्विशतक (२१५) केले. ‘मिर्झ्या’ फेम संयमी खेर हिला मयांकच्या खेळीची भुरळ पडली. तिने ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या. ” मयांक, द्विशतक ठोकल्याबद्दल तुझे अभिनंदन! मयांकचा प्रवास हे अथक परिश्रम आणि खेळाप्रति असलेली श्रद्धा याचं एक उत्तम उदाहरण आहे. निवड समितीनं राष्ट्रीय संघात संधी द्यावी यासाठी तू स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत राहिलास. अखेरीस त्याची दखल घेत तुला टीम इंडियात संधी मिळाली. तुझा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे”, असे संयमीने ट्विट केले.

दरम्यान, मयांक अग्रवालने ३७१ चेंडूत २१५ धावा केल्या. त्याने कसोटी क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावलं. तर रोहितने २४४ चेंडूत १७६ धावा केल्या. विशेष म्हणजे दोघांनीही आपल्या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकार खेचले. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी मात्र पहिल्या डावात थोडीशी निराशा केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा हे फलंदाज झटपट माघारी परतले. त्यामुळे भारताने ७ बाद ५०२ या धावसंख्येवर डाव घोषित केला.