भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे. या वर्षातील भारताची मायदेशात ही पहिलीच कसोटी मालिका आहे. भारताने या आधी मायदेशात शेवटची कसोटी मालिका ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघ मायदेशात खेळणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेचा संघही कसून सराव करत आहे. कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोनही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. या मालिकेबाबत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने मत व्यक्त केले आहे. “जेव्हा गेल्या वेळी आम्ही भारतात आलो होतो, तेव्हा मी एक फलंदाज म्हणून संघात होतो. पण मला भारतीय खेळपट्टीवर खेळणे खूपच कठीण गेले होते. मला भारतीय खेळपट्ट्यांवर अतिशय संयमी आणि बचाबात्मक पवित्रा घेत खेळणे गरजेचे आहे हे मला त्या दिवशी कळून चुकले. आमच्या साऱ्याच फलंदाजांसाठी भारतीय खेळपट्ट्यांवर खेळणे कठीण गेले. पण मला ते थोडे जास्त जाणवले. त्यानंतर केलेल्या सुधारणांमुळे आता मी फिरकी गोलंदाजी अधिक चांगल्या पद्धतीने खेळू लागलो आहे, असे डु प्लेसिस म्हणाला.

“कसोटी क्रिकेटमुळे तुमच्या खेळीतील जे काही बारकावे असतात किंवा चुका असतात, त्या जगासमोर उघड होतात. प्रत्येक खेळाडूने आपल्यात सुधारणा करण्यासाठी कठीण प्रसंगातून जायलाच हवे. त्यामुळेच प्रत्येक खेळाडूला आपण किती चांगल्या प्रकारे खेळू शकतो हे समजते. त्यानंतर मग तुम्ही एक तर क्रिकेट सोडून देऊ शकता किंवा मग तुम्ही दमदार पुनरागमन करू शकता,” असे सांगत त्याने आपण कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.