IND vs SA : ‘टीम इंडिया’ मोडणार का कांगारूंचा ‘हा’ विक्रम?

उद्यापासून आफ्रिकेविरूद्ध दुसरा कसोटी सामना

मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही. आक्रमक गोलंदाजी करत भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला आणि भारताला २०३ धावांनी विजय मिळवून दिला. उद्यापासून भारत आणि आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

पुण्यात १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडण्याची संधी आहे. पुण्याच्या सामन्यात विजय मिळाल्यास घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक कसोटी मालिका विजय मिळवणारा संघ ठरण्याची भारताकडे संधी आहे. भारतीय संघाने मायदेशात फेब्रुवारी २०१३ पासून आतापर्यंत १० कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विक्रम सध्या संयुक्तपणे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या नावावर आहे. पण जर भारताने पुण्याची कसोटी जिंकली तर भारत मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेईल. त्याचसोबत भारत ऑस्ट्रेलियाचा विक्रमही मोडीत काढेल.

दरम्यान, पहिल्या डावात भारताने ५०२ धावांवर डाव घोषित केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकेने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात पुन्हा धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे आफ्रिकेपुढे दीड दिवसांत डोंगराएवढे आव्हान होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना तळाच्या डेन पिटने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. त्याला इतर कोणाचीही साथ मिळू शकली नाही. त्यामुळे आफ्रिकेला सामना वाचवता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने ५, रविंद्र जाडेजाने ४ तर आश्विनने १ बळी घेतला.

READ SOURCE