दक्षिण आफ्रिकेने कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेरच्या टी २० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. भारताने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. त्यात डी कॉकने नाबाद ७९ धावा केल्या आणि १७ व्या षटकातच आफ्रिकेला विजय मिळवून दिला. या विजयासह तीन टी २० सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीत सुटली.

भारताच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजांकडून चाहत्यांना अपेक्षा होती. पण भारताच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. १७ षटकांच्या खेळात भारताला केवळ १ बळी टिपता आला. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी भारताच्या पराभवाचे कारण सांगितले. भारताच्या गोलंदाजांनी आखूड टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याचा फटका भारतीय गोलंदाजांना बसला, असे भोगले यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने किमान शेवटच्या षटकांमध्ये तरी फटकेबाजी करायला हवी होती. पण भारतीय फलंदाजांना ते शक्य झाले नाही. तसेच आफ्रिका ज्या लयीत खेळली, ती लय भारताला संपूर्ण सामन्यात सापडली नाही. त्यामुळे भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही असेही भोगले यांनी ट्विटमध्ये नमूद केले.

दरम्यान, १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. हेंड्रिग्ज २८ धावांवर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण डी कॉकने बावुमाच्या साथीने आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

त्याआधी, भारतीय फलंदाज बंगळुरुच्या मैदानात पुरते अपयशी ठरले. ब्युरेन हेंड्रिग्ज, बिजॉर्न फोर्टेन यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला १३४ धावांवर रोखण्यात आफ्रिकेने यश मिळवले. सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि ऋषभ पंत कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली त्यामुळे भारताला १३४ धावांचा टप्पा गाठता आला.