“काही वेळा सामन्याचा निकाल विरोधात जाऊ शकतो. ठरलेल्या योजनांची अंमलबजावणी नीट होत नाही. पण आम्ही आमच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा करत आहोत. सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सर्वोत्तम गोलंदाजी केली. खेळपट्टीकडून त्यांच्या गोलंदाजांना चांगली मदत मिळाली. पण आमच्या गोलंदाजांना मात्र खेळपट्टीचा चांगला वापर करून घेता आला नाही. त्यामुळे आम्हाला पराभूत व्हावे लागले”, अशी प्रामाणिक कबुली भारताचा कर्णधार विराट कोहली याने दिली.

आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले. भारताने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. डी कॉकने नाबाद ७९ धावा केल्या आणि १७ व्या षटकातच सामना जिंकला. तीन टी २० सामन्यांची ही मालिका अखेरीस १-१ अशा बरोबरीत सुटली.

“आव्हानाचा पाठलाग करणे हे टी २० क्रिकेटमध्ये तुलनेने सोपे असते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुमच्याकडे सामन्यात पुनरागमन करण्यासाठी पुरेसा वेळ असतो. पण टी २० क्रिकेटमध्ये मात्र ४० ते ५० धावांची एखादी भागीदारीदेखील सामन्याचा निकाल बदलण्यासाठी पुरेशी ठरते. तुम्ही २०० हून अधिक धावा केल्या असतील, तरी एखाद्या भागीदारीमुळे तुमच्यावर पटकन दबाव येतो. संघातील अंतिम ११ खेळाडू कोण असावेत याबद्दल आम्ही कायम सांगोपांग विचार करूनच निर्णय घेत असतो. आम्ही कोणतेही ११ खेळाडू घेऊन मैदानात उतरत नाही. ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, त्यांनाच आम्ही संधी देतो, असेही कोहलीने या वेळी स्पष्ट केले.

आमच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे. त्या साऱ्यांना एक संघ म्हणून एकत्र येण्यासाठी वेळ द्यायला हवा. आज आम्ही नवव्या फलंदाजांपर्यंत फलंदाजी केली. हा गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. आम्ही या गोष्टीवर नक्कीच लक्ष देऊ आणि संघ अधिकाधिक भक्कम करू, असेही कोहलीने सांगितले.