दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे आपल्या संघातील स्थानाला मुकावं लागलं होतं. बुमराहच्या जागी उमेश यादवची भारतीय संघात निवड करण्यात आली. विशाखापट्टणम कसोटीत भारताने विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली, मात्र या कसोटीत उमेशला अंतिम संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र पुण्यातील गहुंजे मैदानाची खेळपट्टी पाहता विराट कोहलीने हनुमा विहारीला विश्रांती देत उमेश यादवला संघात स्थान दिलं.

उमेश यादवनेही आपल्या कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उमेशने दोन्ही डावांत मिळून ६ फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीसह उमेश यादवने घरच्या मैदानावर सलग कसोटी सामने खेळताना सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान उमेश यादवने १६ बळी घेतले आहेत.

या मालिका विजयामुळे भारताचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान अधिक भक्कम होणार आहे. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.