सलामीवीर म्हणून भारतीय संघात पहिली कसोटी खेळणाऱ्या रोहित शर्माने लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्वतःला सिद्ध केले. पहिल्या डावात १७६ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करून दाखवली. रोहित शर्मा सलामीवीर म्हणून खेळताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण मैदानावर खेळताना मात्र रोहित चुकून किंवा रागाच्या भरात एक आक्षेपार्ह शब्द बोलून गेला.

दुसऱ्या डावात जेव्हा रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सलामीवीर म्हणून मैदानात उतरला, तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून आपला २०० वा डाव खेळण्यास सुरूवात केली. त्याने दमदार सुरूवात केली, पण मयांक अग्रवाल मात्र लवकर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजारा बरोबर रोहितने हळूहळू भागीदारी रचण्यास सुरूवात केली. याच दरम्यान, रोहितला एक चोरटी धाव घ्यायची होती. पण पुजाराने साफ नकार दिला. त्यामुळे रोहित रागाच्या भरात चुकून बोलू नये असा एक आक्षेपार्ह शब्द बोलून गेला.

रोहित ओघात तो शब्द बोलून गेला हे खरं.. पण चाणाक्ष नेटिझन्सने रोहितचा ‘तो’ शब्द लगेच पकडला. अनेकांनी त्याचे व्हिडीओ टाकत ट्विटही केले. इतकंच नव्हे तर त्या शब्दाच्या उच्चारासारखाच उच्चार असणारा शब्द म्हणजेच बेन स्टोक्स यानेही लगेच ट्विट करत रोहितला कोपरखळी मारली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत बेन स्टोक्स म्हणाला होता की विराट प्रत्येक वेळी गडी बाद झाला की माझे नाव घेतो. पण त्या आक्षेपार्ह शब्दाचा उच्चार केवळ बेन स्टोक्स या शब्दाशी मिळताजुळता आहे हे त्याला नंतर समजले होते. तरीदेखील आज त्याने रोहितची खिल्ली उडवण्याची संधी न दवडता ट्विट केले.