पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने शतक ठोकले. त्याच्या खेळीच्या बळावर भारत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आणखी मजबूत स्थितीत पोहोचला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासोबत शतकी भागीदारी करताना विराटने कसोटी कारकिर्दीतील २६ वे शतक लगावले. विराटचे हे मायदेशातील मैदानावर १२ वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ६९ वे शतक ठरले.

विराटचे कर्णधार म्हणून टी २०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेटप्रकारात मिळून हे ४० वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. भारतीय संघाचे नेतृत्व करताना ४० शतके झळकावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. महेंद्रसिंग धोनीलादेखील कर्णधार म्हणून खेळताना ४० आंतरराष्ट्रीय शतके झळकावता आलेली नाहीत, पण विराटने मात्र हा पराक्रम करून दाखवला.

विराटने धडाकेबाज शतकासह आणखीही एक पराक्रम केला. त्याने शतकी पराक्रमासह दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवले. मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे बाद झाल्यानंतर विराटने अत्यंत सावधपणे खेळ करत आपले शतक झळकावले. तब्बल १० डावांनंतर त्याने कसोटीत शतक झळकावले. या आधी त्याने डिसेंबर २०१८ मध्ये पर्थच्या मैदानावर शेवटचे कसोटी शतक ठोकले होते. या शतकाच्या बळावर त्याने कमी डावात २६ कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला. या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन (६९) अव्वल, स्टीव्ह स्मिथ (१२१) आणि सचिन तेंडुलकर (१३६) तिसऱ्या क्रमांकावर आहे.