भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं १५० धावांचं लक्ष्य कोहलीने सर्वात आधी शिखर धवन आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या साथीने पूर्ण केलं. त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी त्याचा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. यादरम्यान विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदीला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणारे खेळाडू –

  • मोहम्मद नबी – अफगाणिस्तान – १२
  • विराट कोहली – भारत – ११
  • शाहिद आफ्रिदी – पाकिस्तान – ११

विराट कोहलीची ही खेळी पाहून शाहिद आफ्रिदीनेही त्याचं कौतुक केलं आहे. तू खरोखरच एक सर्वोत्तम खेळाडू आहेस, यापुढेही जगभरातल्या तुझ्या चाहत्यांसाठी असाच खेळत रहा अशा शब्दांमध्ये आफ्रिदीने कोहलीची पाठ थोपटली आहे.

दरम्यान या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.