मोहालीच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात केली. सध्या भारत या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७२ धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पहिल्या स्थानावर पोहचला आहे. अर्धशतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने रोहित शर्माला आणखी एका कामगिरीत मागे टाकलं आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट पहिल्या स्थानावर पोहचला आहे. आफ्रिकेविरुद्धची अर्धशतकी खेळी ही त्याची टी-२० क्रिकेटमधली २२ वी अर्धशतकी खेळी ठरली. रोहित शर्माने २१ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्माच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकांची नोंद आहे तर विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये अद्याप एकही शतक झळकावू शकला नाहीये.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढणारे फलंदाज पुढीलप्रमाणे –

  • विराट कोहली (भारत) – २२
  • रोहित शर्मा (भारत) – २१
  • मार्टीन गप्टील (न्यूझीलंड) – १६
  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – १५
  • ब्रँडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – १५
  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – १४

दरम्यान या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.