दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ९ गडी राखत आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक चिंताजनक बातमी आहे. फलंदाजीदरम्यान नियमाचा भंग केल्याप्रकरणी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी विराटला शिस्तभंगाचा एक गुण (Demerit Point) दिला आहे. विराटकडून आयसीसीच्या Level 1 मधील 2.12 नियमाचा भंग झाला आहे.

सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडू, पंच किंवा इतर व्यक्तींना अयोग्यपणे धक्का दिल्यास खेळाडूवर कारवाई होते. भारतीय संघ फलंदाजी करत असताना विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्युरेन हेंड्रिग्जला धक्का दिला होता. सामनाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये विराट कोहलीने आपली चूक मान्य केली. विराट कोहलीच्या खात्यात सध्या ३ शिस्तभंगाचे गुण (Demerit Point) जमा आहेत. कोणत्याही खेळाडूने ४ गुणांचा टप्पा ओलांडला तर त्याच्यावर १ कसोटी किंवा २ टी-२०/वन-डे सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. टी-२० मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.