पुणे कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १ डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. विराट कोहलीने २५४ धावा केल्या. या खेळीनंतरही आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

अव्वल स्थानी असलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहलीच्या गुणांमध्ये अवघ्या एका गुणाचा फरक आहे. स्मिथच्या खात्यात ९३७ तर विराट कोहलीच्या खात्यात ९३६ गुण जमा आहेत.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांत डावाने विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. पुणे कसोटीत डावाने मिळवलेला विजय हा विराटच्या नेतृत्वाखाली भारताचा आठवा विजय ठरला आहे. सौरव गांगुलीच्या नावावर कर्णधार या नात्याने कसोटी क्रिकेटमध्ये डावाने सात विजयाची नोंद आहे. या मालिका विजयामुळे भारताचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान अधिक भक्कम होणार आहे. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.