श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या एकदिवसीय सामन्यात दिनेश कार्तिकच्या नावे एका खराब विक्रमाची नोंद झाली. या सामन्यात दिनेश कार्तिकने १८ चेंडूचा सामना केला. तीन षटके फलंदाजी केल्यानंतरही त्याला खाते उघडता आले नाही. धर्मशाळेच्या मैदानातील दिनेशची ही खेळी क्रिकेटच्या मैदानातील भारतीय फलंदाजाकडून झालेली सर्वात खराब कामगिरी आहे. सर्वाधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याचा विक्रम कार्तिकच्या नावे झाला.

यापूर्वी १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकनाथ सोलकर यांना १६ चेंडूत खाते उघडता आले नव्हते. ओव्हलच्या मैदानातील भारतीय फलंदाजाने अधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याच्या खराब विक्रमाची नोंद झाली होती. कार्तिकने त्यांच्यापेक्षा एक चेंडू अधिक खेळत खराब विक्रम नोंदवला. याशिवाय भारताचा माजी कर्णधार सौरव गांगलीने कोलंबोच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध अशी खराब कामगिरी केली होती. गांगुलीला १६ चेंडूचा सामना केल्यानंतर एकही धावा करता आली नव्हती.
दिनेश कार्तिकसोबतच सलामीवीर शिखर धवनही शून्यावर बाद झाला. तर रोहित शर्मा, मनीष पांडे, श्रेयस अय्यर यांना दोन अंकी धावसंख्येचा आकडा देखील पार करता आला नाही. केवळ हार्दिक पांड्याने सर्वोच्च दहा धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर आता भारतीय संघाची मदार महेंद्रसिंग धोनीवर आहे.

यापूर्वी रंगलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पण एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमालीचा खेळ दाखवला. परिणामी सध्याच्या परिस्थिती भारतीय संघ बॅकफूटवर आहे.