भारताने श्रीलंका दौऱ्यावर आत्तापर्यंत आपली उत्तम कामगिरी बजावली आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्यांनी यजमानांना ३८ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका २-१ने जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-२० मालिकेतही विजयासह सुरुवात केली. पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या काही खास कामगिरी करू शकला नाही, तरीही तो चर्चेत राहिला.

सामना सुरू होण्यापूर्वीच केलेल्या एका गोष्टीमुळे हार्दिक पंड्या चर्चेत होता. तो श्रीलंकेचे राष्ट्रगीत गाताना दिसला. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत वाजवले जाते. जेव्हा श्रीलंकेचे राष्ट्रगीत चालू होते, त्यावेळी हार्दिक श्रीलंकेचे राष्ट्रगीत गात होता. त्याचा व्हिडिओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात ही टी-२० मालिका खेळली जात आहे. हार्दिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहतेही त्याचे कौतुक करत आहेत.

 

 

 

 


हेही वाचा – कुस्तीपटू प्रिया मलिकचं अभिनंदन करताना टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी केली ‘ही’ मोठी चूक!

असा रंगला पहिला टी-२० सामना

वनडे मालिका खिशात टाकल्यानंतर धवनसेनेने टी-२० मालिकेची सुरुवातही दणक्यात केली. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेची घसरगुंडी उडाली. नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने आपला दमदार फॉर्म कायम राखत अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात श्रीलंका २० षटकात १२६ धावांवर ढेपाळली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ बळी घेतले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.