बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून युवा श्रेयस अय्यरने ६२ तर लोकेश राहुलने ५२ धावा केल्या. बांगलादेशकडून मोहम्मद नईमने ८१ धावांची झुंजार खेळी केली, पण दिपक चहरने ७ धावांत ६ बळी घेत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका २-१ अशी जिंकवून दिली.

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने दमदार ४३ चेंडूत ८५ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला शतक ठोकता आले नाही, पण रोहितने केलेले एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव अडीचशतक हे कायम चाहत्यांच्या स्मरणात आहे. हा पराक्रम रोहितने आजच्या तारखेलाच केला होता.

१३ नोव्हेंबर २०१४ ला भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान होते. रोहित नेहमीप्रमाणे फलंदाजी आला आणि त्याने एक विश्वविक्रम केला. या सामन्यात रोहितने २६४ धावांची तुफानी केली केली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. ही २६४ धावांची खेळी रोहितने १७३ चेंडूंमध्ये केली होती. या खेळीत ३३ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. हे रोहितचे एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे द्विशतक होते. त्याआधी रोहितने २ नोव्हेंबर २०१३ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा केल्या होत्या. तर १३ डिसेंबर २०१७ला त्याने श्रीलंकेविरुद्ध तिसरे द्विशतक लगावले होते.

दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात पहिले द्विशतक मास्टर ब्लास्टर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने फटकावले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवागनेही द्विशतक ठोकले. पण रोहितच्या नावावर आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात तब्बल तीन द्विशतके आहेत.