श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. क्रुणाल पंड्याच्या संपर्कात आलेल्या आठ भारतीय खेळाडूंची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्याआधी अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याला करोनाची लागण झाली. कोलंबोमधील आजचा टी -२० पुढे ढकलला गेला. आता हा सामना उद्या २८ जुलैला होणार आहे. क्रुणाल सात दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत असल्याने तो मालिकेबाहेर पडला आहे.

श्रीलंकेच्या आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत, कृणाल ३० जुलैला उर्वरित भारतीय संघासह मायदेशी परत येऊ शकणार नाही. अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यावर त्याला निगेटिव्ह चाचणीची प्रतीक्षा करावी लागेल.

विराटला दिलासा

इंग्लंड दौर्‍यावर गेलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या वृत्तामुळे दिलासा मिळाला आहे. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहेत. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे कसोटी मालिकेबाहेर व्हावे लागले. पृथ्वी आणि सूर्यकुमार यांनी इंग्लंड दौर्‍यावर जाण्यासाठी करोना चाचणी निगेटिव्ह येणे खूप महत्वाचे होते.

हेही वाचा – खेळात अन् प्रेमात… जोडीनं मेडल जिंका… Olympic मधील जोडपी 

वनडे मालिकेपूर्वीही करोनाची ‘एन्ट्री’

भारताने वनडे मालिका २-१ने जिंकली होती आणि टी-२० मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि व्हिडिओ विश्लेषक वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीच करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे ही मालिकाही पुढे ढकलण्यात आली होती.