कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत आणि श्रीलंका संघात दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात लंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अकिला धनंजया आणि वनिंदू हसरंगा या फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेने भारताला २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखले.  करोनाची बाधा झालेल्या कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे भारताचे अनुभवी क्रिकेटपटू टी-२० मालिकेतून बाहेर झाले. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा आणि चेतन साकारिया यांना आज टी-२० पदार्पणाची संधी मिळाली.

भारताचा डाव

पदार्पणाची संधी मिळालेला महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने कर्णधार शिखर धवनसोबत सलामी दिली. पदार्पणात मोठ्या खेळीकडे प्रवास करताना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने ऋतुराजला यष्टीपाठी झेलबाद केले. ऋतुराजने २१ धावा केल्या. ऋतुराज-शिखरने ४९ धावांची सलामी दिली. ऋतुराज बाद झाल्यानंतर दुसरा पदार्पणवीर देवदत्त पडिक्कल मैदानात आला. त्याने आणि धवनने संघाची धावगती वाढवली. १३व्या षटकात फिरकीपटू अकिला धनंजयाने पहिल्याच चेंडूवर भारताच्या कर्णधाराला माघारी धाडले. धवनने ५ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. शतकाचा टप्पा ओलांडण्यापूर्वी भारताने देवदत्त पडिक्कलला गमावले. पडिक्कलने २९ धावा केल्या. हसरंगाने त्याला बाद केले. टी-२०मध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा संजू सॅमसनही आज ७ धावांवर माघारी परतला. धनंजयाने पुन्हा गोलंदाजीला येत त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर भुवनेश्वर आणि नितीश राणा यांनी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्याच अपयश आहे. लंकेकडून अकिला धनंजयाने ४ षटकात २९ धावा देत २ बळी घेतले.

 

हेही वाचा – महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचं टीम इंडियासाठी पदार्पण, धोनीच्या ‘त्या’ सल्ल्यानं पालटलं नशीब!

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतूराज गायकवाड, नितीश राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चहर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, नवदी सैनी.

श्रीलंकेचा संघ

अविष्का फर्नांडो, बिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डि सिल्वा, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका (कर्णधार), रमेश मेंडिस, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, अकिला धनंजया, दुश्मंता चमीरा.