युवा वेगवान गोलंदाज मानसी जोशी हिने केलेली भेदक गोलंदाजी व त्यानंतर सलामीवीर स्मृती मानधनाने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर तब्बल ९ विकेट व १८१ चेंडू राखून दणदणीत मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने दिलेले अवघ्या ९९ धावांचे लक्ष्य भारताने १९.५ षटकांतच गाठले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन फलंदाजांची भारतीय गोलंदाजांपुढे पुरती भंबेरी उडाली. प्रसादनी विराक्कोडीला (२ धावा) बाद करत मानसीने श्रीलंकेला ८ धावांवरच पहिला धक्का दिला. अनुभवी झुलन गोस्वामीनेसुद्धा निपोनी हंसिकाला यष्टिरक्षक तानिया भाटियाकडे झेलबाद करत त्यांची अवस्था आणखी बिकट केली. ठरावीक अतंराने एकामागोमाग एक फलंदाज बाद झाल्याने श्रीलंकेचा संघ ५० षटकांच्या आतच गारद होणार अशी चिन्हे दिसू लागली. कर्णधार चामरी अटापट्टू (३३) व सातव्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेल्या श्रीपली विराक्कोडी (२६) या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला विशीसुद्धा ओलांडता आली नाही. त्यामुळे, श्रीलंकेचा डाव ३५.१ षटकांत ९८ धावांवर संपुष्टात आला. भारतासाठी मानसीने १६ धावांत सर्वाधिक तीन, तर झुलन व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात स्मृती आणि पूनम राऊत यांनी अगदी आरामात फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १८.४ षटकांतच ९६ धावांची भागीदारी रचली. स्मृतीने नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करताना ७६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७३ धावा काढल्या. मागील सहा सामन्यांतील स्मृतीचे हे पाचवे अर्धशतक ठरले. इनोका रणवीराने पूनमला २४ धावांवर बाद करत श्रीलंकेला सामन्यातील पहिले यश मिळवून दिले. मात्र कर्णधार मिताली राजच्या साथीने स्मृतीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीच्या कर्णधारपदाखाली भारताचा हा ७२वा विजय ठरला. तिने इंग्लंडच्या चालरेट एडवर्डसचा ७१ सामन्यांचा विक्रम मागे टाकला. मालिकेतील दुसरा सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) या महिला अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संक्षिप्त धावफलक :

श्रीलंका – ३५.१ षटकांत सर्वबाद ९८ (चामरी अटापट्टू ३३, श्रीपली विराक्कोडी २६; मानसी जोशी ३/१६); भारत – १९.५ षटकांत १ बाद १०० (स्मृती मानधना नाबाद ७३, पूनम राऊत २४)