वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईच्या मैदानात पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. खराब सुरुवातीनंतरही श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांनी शतकी भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. मात्र या सामन्यादरम्यान एक वेगळाच मजेशीर प्रसंग पहायला मिळाला.
सामन्यात २६ व्या षटकादरम्यान मैदानात अचानक एक भटका कुत्रा शिरल्यामुळे सामना काहीकाळ थांबवण्यात आला. या अनाहुत पाहुण्याला मैदानाबाहेर घालवण्यासाठी आणि पकडण्यासाठी खेळाडूंचीही चांगलीच धावपळ झाली.

दरम्यान, भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. सुरुवातीच्या षटकांमध्ये राहुल आणि रोहित शर्मा या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळताना अडचण होत होती. अखेरीस कोट्रेलने सातव्या षटकात राहुल आणि विराटला माघारी धाडत भारताला धक्के दिले. यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित शर्माही ३६ धावा काढून अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या तरुण खेळाडूंनी सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली.

दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला. चौथ्या विकेटसाठी पंत आणि अय्यरने ११४ धावा जोडल्या. पंत ७१ तर श्रेयस अय्यर ७० धावांवर माघारी परतला. यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत धावांचा ओघ सुरुच ठेवला. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या तळातल्या फळीतील फलंदाजांनी संघाला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कोट्रेल, किमो पॉल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी २-२ तर कायरन पोलार्ड यांनी १ बळी घेतला.