वेस्ट इंडिजचा फलंदाज शेमरॉन हेटमायरने चेन्नई वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. भारतीय संघाने विजयासाठी दिलेलं २८८ धावांचं आव्हान पार करताना विंडीजची सुरुवात खराब झाली होती. मात्र यानंतर मैदानात आलेल्या शेमरॉन हेटमायरने शाई होपच्या साथीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत विंडीजच्या संघाचं पारडं जड ठेवलं. हेटमायरने १०६ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १३९ धावा केल्या. याचसोबत दुसऱ्या विकेटसाठी हेटमायरने शाई होपसोबत द्विशतकी भागीदारीही केली.

अवश्य वाचा – IND vs WI : हेटमायरच्या फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाज निष्रभ, मैदानाच्या चौफर फटकेबाजी

भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत हेटमायरने सुरेख फटकेबाजी केली. सामन्यात ३६ व्या षटकात हेटमायरने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत चेंडू थेट चेपॉक मैदानाच्या बाहेर मारला. हेटमायरचा हा आक्रमक अवतार पाहून भारतीय कर्णधार विराट कोहलीही हतबल झालेला पहायला मिळाला. पाहा या षटकाराचा व्हिडीओ…

याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या विंडीज फलंदाजांमध्ये आता हेटमायरचं नावही घेतलं जाणार आहे. त्याने विंडीजचे माजी फलंदाज सर व्हिव रिचर्ड्स यांच्याशी बरोबरी केली आहे. याव्यतिरीक्त सर्वात कमी डावांमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पाच शतकं झळकावणाऱ्या विंडीज फलंदाजांच्या यादीतही हेटमायर पहिल्या स्थानी पोहचला आहे. त्याने ही कामगिरी ३८ डावांमध्ये केली आहे.