वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हैदराबादच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऐरवी भारतीय माऱ्यासमोर ढेपाळणारा विंडीजचा संघ पहिल्या सामन्यात आश्वासक खेळताना दिसला. लेंडल सिमन्स लवकर माघारी परतल्यानंतरही एविन लुईसने ब्रँडन किंगच्या मदतीने फटकेबाजी करत आपल्या संघाला ५ षटकांमध्येच ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.

एविन लुईसने १७ चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान लुईसने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनचा विक्रम मोडला आहे. भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लुईस आता पहिल्या स्थानी पोहचला आहे.

भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने लुईसला आपल्या जाळ्यात अडकवत माघारी धाडलं.