शेमरॉन हेटमायर, एविन लुईस आणि कर्णधार कायरन पोलार्ड या त्रिकुटाने गेलेल्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या टी-२० सामन्यात भारताविरुद्ध २०७ धावांपर्यंत मजल मारली आहे. हेटमायरने या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करत ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला लुईस आणि पोलार्डनेही उत्तम साथ दिली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची पहिल्या डावातही कामगिरी अतिशय खराब झाली.

भारतीय गोलंदाजांनी आखुड टप्प्याचे चेंडू टाकत विंडीजच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचं आमंत्रणच दिलं. दिपक चहरने लेंडल सिमन्सला झटपट माघारी धाडत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र यानंतर त्याचाही सूर हरवला. विंडीजच्या गोलंदाजांनी चहरच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा वसुल केल्या. दीपक चहरने ४ षटकात ५६ धावा देत १ बळी घेतला. यामुळे दीपक चहरला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळालं आहे.

जोगिंदर शर्माने २००७ साली टी-२० सामन्यात ५७ धावा मोजल्या होत्या. पहिल्या टी-२० सामन्यात युजवेंद्र चहलला २ बळी मिळाले. याव्यतिरीक्त सर्व गोलंदाज विंडीज फलंदाजांचे बळी ठरले.