लेंडन सिमन्स आणि इतर विंडीज फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ८ गडी राखून मात केली. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी पुरती निराशा केली. वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा यासारख्या खेळाडूंनी तिरुअनंतपुरमच्या मैदानात विंडीजच्या संघाला धावा बहाल केल्या. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही संघाच्या या ढिसाळ क्षेत्ररक्षणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

“पहिल्या ४ षटकांपर्यंत आमची गोलंदाजी चांगली होती. मात्र जर आम्ही संधी गमावत राहिलो तर याचा फटका आम्हाला बसणारच. क्षेत्ररक्षण असचं खराब होत राहिलं तर कितीही धावा करा त्या कमीच पडतील. गेल्या दोन सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षणात आमची कामगिरी चांगली झालेली नाही. एका षटकात आम्ही दोन झेल सोडले आहेत. आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज आहे.” विराटने संघाच्या खराब कामगिरीवर आपलं मत व्यक्त केलं.

अवश्य वाचा – Video : ढिसाळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विराटने दाखवून दिलं, असा पकडतात झेल…

दरम्यान, सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाने काही चांगल्या संधी दवडल्या. याचा फायदा घेत विंडीजच्या फलंदाजांनी मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. एविन लुईस आणि हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेतला.