भारतीय संघाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची अवस्था ७ बाद ८७ अशी दयनीय झाली. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास भारताला मदत केली. वेस्ट इंडिजचे सात पैकी सहा गडी बुमराहने माघारी धाडले. त्याआधी भारताला हनुमा विहारीच्या दमदार शतकाच्या बळावर ४०० पार मजल मारता आली. हनुमा विहारीचे हे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले. महत्वाचे म्हणजे त्याने त्याच्या या शतकाचे श्रेय वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दिले आहे.

“पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मी 42 धावांवर नाबाद होतो. दुसऱ्या दिवशी मैदानावर जाऊन मोठी धावसंख्या उभारायची हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. पण दुसऱ्या दिवसाच्या खेळात शतक ठोकल्यानंतर फार चांगलं वाटलं. आनंद झाला. माझ्या या शतकाचं श्रेय इशांतलादेखील आहे. तो मैदानावर आला, तेव्हा त्याने उत्तम खेळ केला. (त्याने साथ दिली आणि तो खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला म्हणून मला शतक करणे शक्य झाले. तो नसता, तर मला शतक झळकावताच आलं नसतं”, असे सांगत त्याने इशांतला या शतकाचे श्रेय दिलं.

हनुमा विहारीने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक ठोकले. त्याने १११ धावांची सुंदर खेळी करून दाखवली. त्याने कारकिर्दीतील सहाव्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. याशिवाय, इशांतनेही आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने ८० चेंडूत ५७ धावांची दमदार खेळी केली. तर गोलंदाजीत बुमराहने १६ धावांत ६ बळी टिपले.