वेस्ट इंडिजच्या शाई होपने यंदाच्या वर्षात आपली चांगली छाप सोडली आहे. भारताविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात होपने वन-डे क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. कटक वन-डे सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. होप आणि लुईस यांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

यादरम्यान शाई होप वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३ हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. ६७ डावांमध्ये शाई होपने ही कामगिरी केली आहे.

दरम्यान सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत होप सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण करण्याच्या निकषात अव्वल स्थानी आहे.

दरम्यान अखेरच्या वन-डे सामन्यात शाई होपने ५० चेंडूत ५ चौकारांसह ४२ धावांची खेळी केली. मोहम्मद शमीने त्याचा त्रिफळा उडवला. भारत दौऱ्यात वेस्ट इंडिजच्या संघाने टी-२० आणि वन-डे मालिकेत भारताला चांगली लढत दिली. मात्र टी-२० मालिकेत त्यांना २-१ ने हार मानावी लागली होती.