वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात करत भारतीय संघाने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेलं २४१ धावांचं आव्हान वेस्ट इंडिजला पेलवलं नाही. कर्णधार कायरन पोलार्डच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिजने १७३ धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली.

अवश्य वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये ‘मालिकावीर’ विराट कोहलीचा षटकार

वेस्ट इंडिजचा केजरिक विल्यम्स आणि विराट कोहली यांच्यात अखेरच्या सामन्यातही द्वंद्व पहायला मिळालं. पहिल्या सामन्यात विराटने विल्सम्सची गोलंदाजी फोडून काढत, त्याच्याच नोटबुक स्टाईलने सेलिब्रेशन केलं होतं. यानंतर दुसऱ्या सामन्यात विल्यम्सने विराटची विकेट काढत, तोंडावर बोट ठेवून फिट्टमफाट केली. यानंतर तिसऱ्या सामन्यात विराटने पुन्हा एकदा सर्व विंडीज गोलंदाजांसह विल्यम्सची गोलंदाजीही फोडून काढली. सामन्यात १८ व्या षटकात विल्यम्सच्या गोलंदाजीवर विराटने उत्तुंग षटकार खेचत विल्यम्सला डिवचण्याचा प्रयत्न केला. हा षटकार खेचल्यानंतर खुद्द विराट कोहलीही अवाक झाला होता. पाहा या घटनेचा व्हिडीओ….

खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवातही खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. हे फलंदाज विंडीजचा डाव सावरणार असं वाटत असतानाच, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. मात्र यानंतरही कायरन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत पोलार्डने उत्तुंग षटकार ठोकले. मात्र ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. यानंतरची भारतीय गोलंदाजांनी आपली उरली-सुरली जबाबदारी पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.