भारताने एकदिवसीय मालिकेत विंडिजचा २-० असा पराभव केला. आता २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत कसोटी मालिका रंगणार आहे. हा दौरा संपण्यासाठी अद्याप सुमारे १८ ते २० दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तरीदेखील टीम इंडियाच्या एका सदस्याला तडकाफडकी मायदेशी परत बोलवण्यात आले होते. गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली त्याला BCCI ने मायदेशी परतण्याचा आदेश दिला होता, पण आता मात्र BCCI ने तो निर्णय मागे घेतला आहे.

भारताच्या संघाबरोबर असलेले संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना दौरा सोडून ताबडतोब भारतात परत येण्याचे आदेश BCCI कडून देण्यात आले होते. बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे आदेश दिले होते. भारताच्या विंडिजमधील उच्चायुक्त कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणुक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे त्यांना तातडीने मायदेशी बोलवून घेण्यात आले होते.

मायदेशी परतल्यानंतर त्यांना BCCI समोर हजर राहावे लागणार होते आणि त्यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार होते. पण आता मात्र BCCI ने या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी माफी मागितल्यामुळे आता त्यांना एक संधी देण्यात आली आहे. प्रशासकीय समिती आणि सुब्रमण्यम यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी आपली चूक मान्य केली. त्यामुळे त्यांना उर्वरित विंडिज दौऱ्यात संघाबरोबर राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

काय आहे प्रकरण –

टीम इंडियाच्या खेळाडूंनी ‘पाणी वाचवा’ या विषयावरील एका जाहिरातीत अभिनय करावा, अशी विनंती भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी केली होती. त्यांनी या विनंतीचे पत्र संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना दिले होते. त्रिनिदाद आणि तोबॅगोमधील भारताचे उच्चपदस्थ अधिकारी यांनी ज्यावेळी सुनील सुब्रमण्यम यांना सहकार्यासाठी मेसेज केले, तेव्हा मला त्रास देऊ नका, असे उत्तर सुनील सुब्रमण्यम यांनी दिले होते. त्यांनी गैरवर्तणूक केल्यामुळे त्यांना मारदेशी परत बोलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी बिनशर्त माफीदेखील मागितली होती.