भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अँटीग्वा येथे सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटीसाठी विराट कोहलीने भारतीय संघात तीन जलदगती गोलंदाज आणि अष्टपैलू गोलंदाज रविंद्र जाडेजाला संधी दिली. रविचंद्रन आश्विनला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आश्विनला अखेरीस राखीव खेळाडू म्हणून संघाबाहेर बसावं लागलं. भारताच्या या संघनिवडीवर माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

“पहिल्या कसोटीसाठी भारताची संघनिवड ही धोडीशी धक्कादायक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केलेली असतानाही आश्विनला संघात जागा मिळू नये ही गोष्ट धक्कादायक आहे.” पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान समालोचनादरम्यान गावसकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.

२०१६ साली विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत रविचंद्रन आश्विनने अष्टपैलू खेळ करत मालिकावीराचा किताब पटकावला होता.

दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली होती, मात्र लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांच्या संयमी खेळीनंतर भारताचा डाव सावरला.