विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७१ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा या सामन्यात बोलबाला राहिला. त्याने नाबाद १११ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्यामुळेच भारताने विंडीजला १९६ धावांचे लक्ष्य दिले होते.

या सामन्यात मैदानावर रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने फटाक्यांची आतषबाजी करून भारतीयांना खुश केले. पण कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र एक मोठा अपघात सुदैवाने टळला. भारतीय समालोचक सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर हे सामन्याच्या समालोचनासाठी बॉक्समध्ये गेले, तेव्हा काचेचा एक दरवाजा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. पण दोनही समालोचक या बॉक्समधून सुखरूप बाहेर पडले.

या घटनेनंतर संजय मांजरेकर याने याबाबत माहिती दिली. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये जात होतो. त्यावेळी त्याच्या दरवाजाची काच फुटली. पण सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. सर्वजण सुखरूप बाहेर आले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या स्टेडियमवर सुमारे २४ वर्षांनी सामना झाला, त्यामुळे आयोजनातील अनुभवाची उणीव जाणवली, असे मत काहींनी व्यक्त केले.