दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची अवस्था ७ बाद ८७ अशी झाली. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेत दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास भारताला मदत केली. वेस्ट इंडिजचे सात पैकी सहा गडी बुमराहने माघारी धाडले. त्याआधी भारताला हनुमा विहारीच्या दमदार शतकाच्या बळावर ४०० पार मजल मारता आली. हनुमा विहारीने कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठोकले.

हनुमा विहारीने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक ठोकले. त्याने १११ धावांची सुंदर खेळी करून दाखवली. हे शतक हनुमाने आपल्या दिवंगत वडिलांना समर्पित केले. दिवसाचा खेळ संपला, त्यानंतर हनुमा शतकाबद्दल बोलताना म्हणाला की मी १२ वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मी मनात असं ठरवलं होतं की जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळेन तेव्हा मी वडिलांसाठी काहीतरी करून दाखवेन. आज मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक ठोकले आहे, त्यामुळे मी हे शतक माझ्या वडिलांना समर्पित करत आहे. या वेळी हनुमा भावनिक झाल्याचेही दिसून आले.

दरम्यान, “पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मी ४२ धावांवर नाबाद होतो. दुसऱ्या दिवशी मैदानावर जाऊन मोठी धावसंख्या उभारायची हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. पण दुसऱ्या दिवसाच्या खेळात शतक ठोकल्यानंतर फार चांगलं वाटलं. आनंद झाला. माझ्या या शतकाचं श्रेय इशांतलादेखील आहे. तो मैदानावर आला, तेव्हा त्याने उत्तम खेळ केला. (त्याने साथ दिली आणि तो खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला म्हणून मला शतक करणे शक्य झाले. तो नसता, तर मला शतक झळकावताच आलं नसतं”, असे सांगत त्याने शतकाचे श्रेय इशांत शर्माला दिले.