वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला अखेर सूर सापडला आहे. सलामीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने लोकेश राहुल आणि हनुमा विहारीसोबत भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. अजिंक्य आपलं शतक झळकावणार असं वाटत असतानाच ८१ धावांवर गॅब्रिअलने अजिंक्यचा त्रिफळा उडवला. मात्र आपलं शतक हुकल्याचं अजिंक्य रहाणेला अजिबात दु:ख नाहीये, तो पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता.

“मी जोपर्यंत खेळपट्टीवर असतो, तोपर्यंत मी संघाचा विचार करत असतो. मी स्वार्थी माणूस नाहीये, त्यामुळे शतक हुकल्याचं मला फारसं दुःख वाटत नाही. पहिल्या दिवशी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं होतं, त्यामुळे माझी खेळी संघाच्या कामी आली हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. एका क्षणाला माझ्या मनात शतकाचा विचार होता, मात्र खराब सुरुवात झाल्यानंतर खेळपट्टीवर टिकून राहणं अधिक गरजेचं होतं. संघाला गरज असताना मी योग्य खेळी केली ही सर्वात मोठी गोष्ट आहे.” अजिंक्य आपल्या हुकलेल्या शतकाच्या संधीबद्दल बोलत होता.

मोठ्या कालावधीनंतर मी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. सुरुवातीच्या सत्रांमध्ये खेळपट्टीवर चेंडू चांगलाच उसळी घेत होता. केमार रोच, गॅब्रिअल हे चांगला मारा करत होते, त्यामुळे त्यांना सांभाळून खेळणं गरजेचं होतं, अजिंक्य आपल्या खेळीविषयी बोलत होता. दरम्यान पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात २०३ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय फलंदाज धावसंख्येत किती भर घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : ….म्हणून रोहित-आश्विनला संघात स्थान मिळालं नाही – अजिंक्य रहाणे