India vs West Indies 3rd T20 Live Updates : विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. निकोलस पूरनच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर विंडीजने २० षटकात भारताला १८२ धावांचे आव्हान दिले होते. भारताचा ‘गब्बर’ सलामीवीर शिखर धवन याने ९२ धावांची फटकेबाज खेळी करत भारताला सामना जिंकवून दिला. ऋषभ पंतनेही आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. शिखर धवनला सामनावीर तर कुलदीप यादवला मालिकावीर घोषित करण्यात आले.

नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत ६ षटकात अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच होप २४ धावांवर तंबूत परतला आणि विंडीजचा पहिला गडी बाद झाला. पाठोपाठ हेटमायरही २६ धावांवर माघारी परतला. अनुभवी दिनेश रामदीनकडून विंडीजला अपेक्षा होत्या. पण तोदेखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने १५ चेंडूत १५ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचित केले. त्यानंतर डॅरेन ब्राव्हो आणि निकोलस पूरन या जोडीने जोरदार फटकेबाजी केली आणि विंडीजला १८१ धावांपर्यंत मजल मारली. पूरनच्या नाबाद अर्धशतकात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता, तर ब्राव्होच्या ४३ धावांच्या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ४ धावांवर बाद झाला. लोकेश राहुलही १७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर धवन आणि ऋषभ पंत यांनी तडाखेबाज खेळी केली. ऋषभने ३८ चेंडूत ५८ धावा केल्या. यात ५ चौकार आणि ३ षटकार यांचा समावेश होता. शिखर धवनला शतकाने हुलकावणी दिली. तो ९२ धावांच्या खेळीनंतर बाद झाला. त्याने १० चौकार आणि २ षटकार लगावत ही खेळी केली. शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत मनीष पांडेने भारताला विजय मिळवून दिला.