तडाखेबाज फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजी अशा दुहेरी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली. पहिल्या दोन सामन्यांपैकी दोनही संघाने १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टी २० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. आता भारत – वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिकेला १५ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. मात्र त्या आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या एकदिवसीय मालिकेतील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

#CAB : हिंसक आंदोलनामुळे हॉटेलमध्ये अडकले क्रिकेटपटू

भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त असल्याने एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याची शक्यता मुंबई मिररच्या वृत्तानुसार वर्तवण्यात येत आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यानंतर त्याला वेदना होत असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला सांगितले होते. या संबंधात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील सहभागावर साशंकता आहे.

दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असलेल्या भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. दुखापतीच्या कारणामुळे भुवनेश्वर किमार २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या मालिकेनंतर क्रिकेटपासून दूर राहिला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातदेखील त्याला दुखापतीमुळे संघात समाविष्ट करण्यात आले नव्हते.

IPL 2020 Auction : जाणून घ्या तारीख, वेळ, ठिकाण, कधी आणि कुठे दिसणार?

टी २० मालिकेत भारताची बाजी

भारताने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा ठोकल्या. सलामीवीर रोहित शर्मा-लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा पराक्रम केला. विंडीजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या. पंतने मात्र पुन्हा एकदा निराशा केली. विंडीजकडून कोट्रेल, विल्यम्स आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत चौकार-षटकार खेचले. हेटमायर ४१, तर पोलार्ड ६८ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर, शमी, चहर आणि कुलदीप यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.