कसोटीतील विराट विजयानंतर भारतीय संघ २१ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरोधात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघ वर्चस्व गाजवेल. विराट अॅण्ड कंपनीने कसोटीमध्ये वेस्ट इंडिजला विजयाची एकदाही संधी दिली नाही. दोन्ही कसोटी सामने फक्त तीन दिवसांमध्ये जिंकले. गुवाहटी येथे भारतीय संघ पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाची कमान विराट कोहलीकडे आणि तर उपकर्णधार म्हणून रोहित शर्मा काम पाहणार आहे.

आशिया चषकामध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनने दमदार कामगिरी केली होती. या जोडीची घरच्या मैदानावरील कामगिरी आणखी घातक होते. रोहित-शिखर जोडीने वन-डेमध्ये भारतीय संघाला अश्वासक सुरूवात करून दिली आहे. रोहित शर्माने पाकिस्तानविरोधात शतकी खेळी केली आहे तर शिखरने आशिया चषकात दोन शतके झळकावली आहे. या जोडीचा फॉर्म कायम राहिल्यास वेस्ट इंडिजचे गोलंदाज निष्प्रभ होतील. भारताला मोठी धावसंख्या उभा करण्यासाठी या जोडीच्या कामगिरीवर खूप काही अवलंबून आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आरामानंतर नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी आपली ताकद पडताळून पाहण्यासाठी मिळालेली ही संधी विराट सोडणार नाही. वेस्ट इंडिज विरोधात विराट कोहलीची कामगिरी शानदार आहे. विडींज विरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत विराट चौथ्या स्थानावर आहे.

पाच सामन्याच्या या मालिकेत भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावरील फलंदाज कोण? हे कोडं सुटण्याची शक्यता आहे. पंत आणि धोनी यांना अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पंतला वेस्ट इंडिजविरोधात संधी मिळाल्यास एकदिवसीय सामन्यात त्याचे पदार्पण असेल. पंतने दोन्ही कसोटी सामन्यात ९२ धावांची खेळी केली आहे. पंतला संधी दिल्यास भारतीय संघाची मधली फळी आणखी मजबूत होते. सध्या शिखर धवन आणि जाडेजा वगळता भारतीय संघात एकही डाव्या हाताचा फलंदाज नाही. शिखर सलामीला तर जाडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे मधल्याफळीत पंतला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रविंद्र जाडेजावर अष्टपैलू कामगिरीची जबाबदारी देण्यात आली आहे. जाडेजाने आशिया चषकात दमदार कामगिरी करत पांड्यापुढे आव्हान उभे केले आहे. चहल, कुलदीप यांच्यावर फिरकीची धुरा असणार आहेत. तर उमेश यादव ,शामी आणि खलील अहमदवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. खलील अहमदला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

पहिल्या सामन्यासाठी असा असेल संघ –
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायडू, धोनी, पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, चहल, शामी, उमेश यादव