धडाकेबाज लेंडल सिमन्स याच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर विंडीजने दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

वेस्ट इंडीजकडून विजयी खेळी करणाऱ्या सिमन्सने नाबाद ६७ धावा के्ल्या. त्यानंतर बोलताना तो म्हणाला की मला भारताविरूद्ध खेळायला आवडतं. भारताविरूद्ध खेळणं हे एक आव्हान आहे. मी खूप काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो नव्हतो, त्यामुळे आज खेळताना मजा आली. मला हवी तशी सुरूवात करता आली नाही. माझे साथीदार पहिल्या चेंडूपासून चौकार-षटकार खेचत होते, पण मी त्यांच्या आधीच्या पिढीतील खेळाडू आहे. अनुभवी असल्याने मला माझा खेळ आणि भूमिका दोन्ही समजून खेळायचं होतं. पॉवर-प्लेनंतर खेळणं मला अधिक सोपं वाटलं. अतिप्रयत्न न करता मध्येच एखादा चौकार खेचण्याचा माझा कल होता. पूरन आणि हेटमायर यांना सहज चेंडू सीमारेषेपार घालवता येत होत्या, त्यामुळे मी संयम ठेवला. त्याचा फायदा संघाला झाला आणि आम्ही जिंकलो.

सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये ७३ धावांची भागीदारी झाली. विंडीजचा स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे भारतीय संघाने काही चांगल्या संधी दवडल्या. याचा फायदा घेत विंडीजच्या फलंदाजांनी मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. एविन लुईस आणि शिमरॉन हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. सिमन्सने या सामन्यात नाबाद ६७ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेतला.

त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. नाणेफेक जिंकत विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक ठोकत महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. विंडीजकडून हेडन वॉल्श आणि केजरिक विल्यम्स यांनी प्रत्येकी २-२ तर पेरी, शेल्डन कॉट्रेल आणि जेसन होल्डरने १-१ बळी घेतला.