तडाखेबाज फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजी अशा दुहेरी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली. पहिल्या दोन सामन्यांपैकी दोनही संघाने १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टी २० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

Video : भन्नाट…!!! कॅच घेण्याचा इतका चित्तथरारक प्रयत्न कधी पाहिलाय?

निर्णायक सामन्यात पोलार्डने आपला रुद्रावतार दाखवण्यास सुरुवात केली होती. पण त्याला संघासाठी सामना जिंकता आला नाही. त्याने तुफान फटकेबाजी केली. पोलार्डने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. ३९ चेंडूत ६८ धावा करताना त्याने ५ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्यातील एक षटकार पोलार्डने चक्क एका पायावर बसून मारला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीच्या वेळी पोलार्ड चांगलाच फॉर्मात होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पोलार्ड एका पायाच्या गुडघ्यावर बसला आणि त्याने कुलदीपला उत्तुंग असा षटकार लगावला. त्याने लगावलेला षटकार पाहून प्रेक्षकांनीही एकच जल्लोष केला.

वेस्ट इंडिजची धुलाई करणारा राहुल म्हणतो…

सामन्यात पोलार्डचा दमदार पराक्रम

पोलार्डने ३९ चेंडूत ६८ धावा करताना विंडीजकडून टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला. या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. पोलार्डने तिसऱ्या टी २० मध्ये केलेल्या खेळीच्या जोरावर विंडीजकडून ५८ डावात १०५८ धावा केल्या. महत्त्वाचे म्हणजे त्याने याच सामन्यात हजार धावांचा टप्पादेखील पूर्ण केला. तसेच पोलार्डने विंडीजकडून खेळताना सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या केली.

सामन्यानंतर काय म्हणाला पोलार्ड

“या मालिकेमध्ये आमच्या संघासाठी एक बाब खूप चांगली आणि सकारात्मक घडली. संपूर्ण मालिकेत आमची फलंदाजी खूप आक्रमक आणि दमदार झाली. आम्ही एक संघ म्हणून खेळलो. २४० धावांचे आव्हान हे नक्कीच पार केले जाऊ शकते, असे आमच्या डोक्यात होते. कारण याच मैदानावर इंग्लंड विरूद्ध आफ्रिका सामन्यात २३० धावांचे आव्हान पार करण्यात आले होते. पण गोलंदाजीमध्ये आम्हाला सुधारणेला खूप वाव आहे”, असे पोलार्डने सांगितले.

एकदिवसीय मालिकेबाबतदेखील पोलार्डने आपले इरादे स्पष्ट केले. “आम्ही टी २० मालिका २-१ ने गमावली असली, तरी आता तीन एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट मालिका आहे. त्यामुळे या पराभवाचा विचार करत बसणार नसून एकदिवसीय मालिकेवर आम्ही लक्ष केंद्रित करू”, असे तो म्हणाला.