पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने ४८ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.

“मी आणि रोहित आज खेळलो नाही, त्यामुळे आमच्या नवोदित खेळाडूंना त्यांचा खेळ दाखवण्याची संधी मिळाली. संथ खेळपट्टीवर त्या दोघांनी खूप विचारपूर्वक खेळ केला. संथ खेळपट्टीवर सहा गोलंदाजांसह मैदानात उतरणे हे हुशारीचे ठरेल आणि त्यासोबत केदार जाधवदेखील कामचलाऊ गोलंदाजी करेल असा आमचा विचार होता. पण प्रकाशझोतात हा सामना काहीसा वेगळाच ठरला”, असे सामना संपल्यानंतर विराट म्हणाला.

Video : बापरे..!! रोहितने मैदानावरच दिली पोलार्डला शिवी

“वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली. त्यांची स्तुती करायलाच हवी. गोलंदाजीला हवी तशी मदत मिळू शकली नाही. हेटमायर आणि होप दोघांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे आम्ही पराभूत झालो. पण पराभवामुळे फार मोठा बदल झालेला नाही. यातून नक्कीच लवकर सावरायला हवे”, अशी प्रामाणिक कबुली विराटने पराभवानंतर दिली.

पहिल्या सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की

भारताने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. राहुल, रोहित, विराट झटपट बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा डाव सावरला. पंतने ७१ तर अय्यरने ७० धावांची खेळी केली. हे दोघे माघारी परतल्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत भारताला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. कॉट्रेल, पॉल आणि जोसेफ यांनी २-२ तर पोलार्डने १ बळी टिपला.

भारताप्रमाणे विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. मात्र यानंतर हेटमायर आणि होप जोडीने नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत मैदानावर आपला जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत त्यांनी अक्षरश: भारताकडून विजय हिसकावून घेतला. दीपक चहर आणि मोहम्मद शमीने भारताकडून १-१ बळी घेतला.