राहुल, विराट, रोहितची तडाखेबाज फलंदाजी आणि त्याला शिस्तबद्ध गोलंदाजीची मिळालेली जोड यामुळे भारतीय संघाने अखेरच्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली. पहिल्या दोन सामन्यांपैकी दोनही संघाने १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि टी २० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

विंडीजविरूद्ध मालिका विजयात विराटने महत्त्वाचा वाटा उचलला. पहिल्या सामन्यात त्याने ९४ धावांची नाबाद खेळी केली, तर तिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद ७० धावा केल्या. त्यामुळे त्याला मालिकावीर घोषित करण्यात आले. त्यावेळी बोलताना विराट म्हणाला की प्रथम फलंदाजी करताना आम्ही अनेकदा अटीतटीच्या सामन्यात पराभूत झालो आहोत, त्यामुळे प्रथम फलंदाजीबाबत आमच्या मनात साशंकता होती, पण नाणेफेक गमावल्यानंतर आमच्यावर प्रथम फलंदाजीची वेळ आली. त्या वेळी रोहित आणि राहुल हे दोघे अत्यंत स्पष्ट अशा विचारप्रणालीच्या माध्यमातून खेळत होते. त्यांनी केलेल्या तुफानी खेळीचा आम्हाला फायदा झाला आणि म्हणून आम्ही वेस्ट इंडिजला हरवलं.

“आम्ही सामना सुरु होण्याआधी खुप चर्चा केली होती. प्रश्न होता तो मैदानावर जाऊन ठरवलेल्या योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी करण्याचा… स्वत:वरील विश्वास अधिक दृढ करायचा असेल तर त्यासाठी मैदानात जाऊन दमदार कामगिरी करणे हा एकच पर्याय असतो. मला सामन्यात नेहमी फारशी वेगळी भूमिका साकारयची संधी मिळत नाही, पण मला या सामन्यात ती संधी मिळाली. मी राहुलला सांगितलं की तू शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून खेळ आणि फटकेबाजी मी करतो”, असे विराटने सांगितले.

“माझ्या लग्नाचा काल दुसरा वाढदिवस होता. माझ्यासाठी कालचा दिवस खूप खास होता. मी टी २०, एकदिवसीय आणि कसोटी अशा प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो हे मला माहिती आहे. केवळ तुमची विचारशक्ती त्या पद्धतीची असायला हवी. संघातील माझी भूमिका काहीशी काटेरी मुकुटासारखी असते. मला दोन वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. म्हणूनच मी काही वेळा फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची भूमिकाही बजावण्याचा प्रयत्न करतो”, असेही विराट म्हणाला.