भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. सचिनने २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ २०५ डावांमध्ये हा पराक्रम केला. पहिल्या सामन्यातील १४० धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीच्या नावावर २१२ एकदिवसीय सामन्यात २०४ डावांत ९९१९ धावा जमा झाल्या होत्या. त्यानंतर आज ८१ धावांची भर घालून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३६ शतके आणि ४९ अर्धशतके झळकावली आहेत.

पहिल्या सामन्यात शतक झळकाल्यानंतर कोहलीकडून दुसऱ्या सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा होती. ती अपेक्षा त्याने पूर्ण करत अर्धशतक झळकावले. त्या आधी ४४ धावांवर असताना मॅकॉय या गोलंदाजाच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहली खेळत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर कोहलीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच उडाला पण होल्डरला तो चेंडू झेलता आला नाही. या जीवदानाचा कोहलीने पुरेपूर फायदा घेतला. दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा कोहली पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

 

१० हजार धावांचा पल्ला गाठणारे खेळाडू – 

  • सचिन तेंडूलकर (भारत)- १८ हजार ४२६ धावा (भारत)
  • कुमार संगकारा (श्रीलंका) – १४ हजार २३४ धावा
  • रिकी पॉण्टींग (ऑस्ट्रेलिया) – १३ हजार ७०४ धावा
  • सनथ जयसुर्या (श्रीलंका) – १३ हजार ४३० धावा
  • महेला जयवर्धने (श्रीलंका) – १२ हजार ६५० धावा
  • इंजमाम उल हक (पाकिस्तान) – ११ हजार ७३९ धावा
  • जॅक कॅलिस (द. आफ्रिका) – ११ हजार ५७९ धावा
  • सौरभ गांगुली (भारत) – ११ हजार ३६३ धावा (भारत)
  • राहुल द्रविड (भारत) – १० हजार ८८९ धावा (भारत)
  • ब्रायन लारा (वे. इंडिज) – १० हजार ४०५ धावा
  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – १० हजार २९० धावा
  • महेंद्र सिंग धोनी (भारत) – १० हजार १२३ धावा (* निवृत्त झालेला नाही) (भारत)