विंडीजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना भारताने बरोबरीत राखला. एका क्षणी भारत हा सामना गमावणार अशी चाहत्यांना खात्री झाली असतानाही भारतीय गोलंदाजांनी अंधुक गोलंदाजी केली. या बळावर भारताने सामना टाय करून मालिकेत १-० अशी आघाडी राखली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दीडशतक (१५७*) ठोकले आणि भारताला ३२१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण या सामन्याच्या अंती त्याला इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रयू स्ट्रॉस याच्या दुर्दैवी विक्रमाशी बरोबरी साधावी लागली.

दुसऱ्या सामन्यात विराटने अनेक विक्रम केले. सर्वात जलद दहा हजार धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. यासह त्याने आणखी एक विक्रम केला. कर्णधार म्हणून दोन वेळा दीडशेपेक्षा अधिक धावांची वैयक्तिक (१६०* व १५७*) खेळी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. या आधी इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्य्रू स्ट्रॉस याने (१५४ व १५८) यानेही अशी कामगिरी केली होती.

पण याबरोबर त्याच्या आणखी एका विक्रमाशी त्याने बरोबरी केली, जो खरे पाहता दुर्दैवी ठरला. दोन्ही कर्णधारांना दुसऱ्या दीडशतकी खेळीच्या सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील दुसरा सामना बरोबरीत सुटला. स्ट्रॉसलाही दुसऱ्या दीडशतकी खेळीच्या सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले होते. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात २०११ साली बंगळुरुत झालेल्या सामन्यात भारताने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ८ बाद 338 धावा केल्या होत्या.