टीम इंडियाने यजमान विंडीजला पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. पण जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा या दोघांनीही या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

बुमराह सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये आघाडीचा गोलंदाज आहे, पण महत्वाचे म्हणजे इशांत शर्मानेही दमदार गोलंदाजी केली. पहिल्या डावात बुमराहला फारसे यश मिळू शकले नाही. त्यावेळी इशांत शर्माने ५ बळी टिपत विंडिजचा डाव गुंडाळला, तसेच दुसऱ्या डावातही त्याने ३ बळी घेतले. त्याच्या या यशामागे बुमराहने दिलेला सल्ला असल्याचे इशांतने प्रामाणिकपणे कबूल केले.

“विंडिजच्या पहिल्या डावात मैदानावर त्यावेळी पाऊस पडला होता. चेंडू थोडा ओला होता आणि त्यामुळे काही मदत मिळत नव्हती. त्यावेळी आम्ही क्रॉस सीम गोलंदाजी करण्याचा विचार केला. लवकरात लवकर डाव गुंडाळायचा हाच आमचा हेतू होता. खेळपट्टीकडून काहीच मदत मिळत नसल्याने क्रॉस सीम गोलंदाजी करण्याचा सल्ला मला बुमराहनेच दिला. आम्ही तसा प्रयत्न केला आणि त्यातच मला यश मिळाले”, असे इशांत म्हणाला. पहिल्या डावात इशांतने ४२ धावा देऊन ५ बळी टिपले होते.

दरम्यान, इशांतने क्षेत्ररक्षण करतानाही २ झेल टिपले. क्षेत्ररक्षणातील या सुधारणेचे श्रेय त्याने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना दिला.