टीम इंडियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची ७ बाद ८७ अशी दयनीय अवस्था केली. यात महत्वाची बाब म्हणजे जसप्रीत बुमराहने हॅटट्रीक घेतली. वेस्ट इंडिजच्या सात गड्यांपैकी सहा गडी बुमराहने घेतले. त्यात बुमराहने वेस्ट इंडिजचा दुसरा, तिसरा आणि चौथा गडी बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. या पराक्रमासह तो कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. या आधी फिरकीपटू हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तर इरफान पठाणने पाकिस्तानविरूद्ध हॅटट्रिक घेतली होती.

बुमराहने हॅटट्रिक घेत हरभजन आणि इरफान यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यामुळे भारताच्या या दोन हॅटट्रिकवीरांनी बुमराहचे ‘हॅटट्रिक क्लब’मध्ये स्वागत केले.  त्याच्या हॅटट्रिक हरभजन म्हणाला, “तू हॅटट्रिक घेतल्याचा खूप आनंद आहे. तू उत्तम स्पेल टाकलीस. मला तुझा अभिमान आहे. अशीच कामगिरी करत रहा.”

तर इरफान पठाणने त्याचे हॅटट्रिक क्लबमध्ये स्वागत करत त्याला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारताने आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा डाव ४१६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत यजमान संघाला बॅकफूटवर ढकलले. ब्राव्हो, ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत त्याने हॅटट्रीकची नोंद केली. मधल्या फळीत शिमरॉन हेटमायरने कर्णधार जेसन होल्डरच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. मात्र हे दोन्ही फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना वेस्ट इंडिजची अवस्था ७ बाद ८७ अशी झाली.