भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात टी२० आणि एकदिवसीय पाठोपाठ कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवले. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत २५७ धावांनी बाजी मारत मालिकेत २-० अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या सामन्यात सर्वाधिक ७ बळी टिपले.

बुमराहने दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात हॅटट्रिकदेखील घेतली. त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सहज पराभूत केले. त्याच्या कामगिरीची साऱ्यांनी स्तुती केली. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानेही त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

“जसप्रीत बुमराह हा संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू आहे, असे माझे मत आहे. जेव्हा बुमराह भारतासाठी खेळत नाही, तेव्हा ते टीम इंडियाचे सर्वात मोठे नुकसान असते. तो संघातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो संघाचा अविभाज्य भाग आहे. टीम इंडियाला बुमराह मिळाला हे भारताचं भाग्यच आहे”, असं पठाण म्हणाला.

“हॅटट्रिक मिळवणं हा एक वेगळाच अनुभव असतो. प्रत्येक खेळाडूलाच हॅटट्रिक मिळत नाही. ज्याला हॅटट्रिक मिळते, तो गोलंदाज खूपच भाग्यवान असतो. बुमराह हा असा गोलंदाज आहे, जो तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करण्याची क्षमता राखतो. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. बुमराहने घेतलेली हॅटट्रिक ही त्याची शेवटची हॅटट्रिक नक्कीच नसेल”, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.