विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २२ धावांनी विजय मिळवला. भारताने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १६७ धावांपर्यंत मजल मारली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर विंडीजला सुधारित आव्हान देण्यात आले होते. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजच्या संघाला १२० धावा करणं गरजेचं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजला १५.३ षटकांत ९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

या सामन्यात विंडीजला पराभवाचा सामना करावा लागला. मालिका गमावण्याबरोबरच विंडिजच्या एका खेळाडूलाही ICC ने दणका दिला. विंडीजचा दमदार फटकेबाजी करणारा कायरन पोलार्ड याला दंड ठोठावण्यात आला. पोलार्डने मैदानावर राखीव खेळाडूला बोलावून घेतल्यामुळे त्याच्याकडून ICC च्या नियमाचा भंग झाला. राखीव खेळाडूला मैदानात क्षेत्ररक्षणासाठी बोलावण्याआधी पंचांची परवानगी आवश्यक असते. पोलार्डने जेव्हा पंचांना याबाबत विचारले होते तेव्हा पंचांनी त्याला षटक संपेपर्यंत वाट पहायला सांगितले होते, पण पोलार्डने षटक संपायच्या आधीच राखीव खेळाडूला मैदानात बोलावले. त्यामुळे ICC च्या आचारसंहितेतील कलम २.४ अन्वये त्याने नियम मोडला. परिणामी त्याला सामन्याच्या २० टक्के मानधनाची रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली.

दरम्यान, सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोहित-शिखर जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. भारतीय सलामीवीरांची फलंदाजी पाहता भारत मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. मात्र किमो पॉलने शिखर धवनचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराटच्या साथीने काही काळ डाव सावरला. या दरम्यान रोहितने आपले अर्धशतक साजरे केले. पण अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात थॉमसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने ५१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. मोक्याच्या क्षणी भारत धावा जमवू शकला नाही. अखेरीस कृणाल पांड्याने रविंद्र जाडेजाच्या साथीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ चांगली आगेकूच करत होता. पण रोव्हमॅन पॉवेल वगळता कोणालाही फलंदाजीत आपली छाप पाडता आली नाही. त्याने ३४ चेंडूत ५४ धावा ठोकल्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला २२ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.